
सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेचा विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
विवाहितेने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
केल्याप्रकरणी सासूविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील पुनस कडूवाडी येथे १६ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका दिनेश चापडे (वय २२) हिचे ९ मे २०२३ ला पुनस कडूवाडी येथील दिनेश गजानन चापडे याच्याबरोबर लग्न झाले होते; मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासू अनिता गजानन चापडे (वय ६०) हिने तिला त्रास देण्यास सुरवात केली होती. १६ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सासू अनिता चापडे हिने त्यांना क्रूर वागणूक देण्यास सुरवात केली होती. पपईच्या झाडाचे माकडाने नुकसान केले म्हणून तिला शिवीगाळ करत कोयती हातात घेऊन तिच्या अंगावर धावून जात तिला धमकी दिली होती. हा मानसिक त्रास असह्य झाल्याने सून दीपिका चापडे यांनी ६ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी गवत मारण्याचे औषध घेऊन त्यात मुंग्यांची पावडर टाकून प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तिने लांजा पोलिस ठाण्यात सासू अनिता चापडे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी (ता. ७) नोव्हेंबरला तिच्यावर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख करत आहेत.
www.konkantoday.com