मुंबईत आज उष्णतेची लाट; शहरासह उपनगरे, रायगड, रत्नागिरीही तापणार!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई व परिसरात जाणवणाऱ्या उष्म्यात सोमवारी वाढ झाली. आजही अशीच स्थिती कायम राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानुसार मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये उन्हाचा दाह जाणवू लागला असून मुंबईतील तापमानाचा पारा बुधवारपर्यंत आणखी चढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात सोमवारी ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या पाच वर्षांमधील फेब्रुवारीतील हे उच्चांकी तापमान आहे.

दरम्यान, मुंबईत, तसेच कोकणामध्ये मंगळवारी दमट आणि उष्ण हवामानामुळे अधिक त्रास जाणवू शकतो, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचबरोबर मंगळवारी दुपारी घरी किंवा कार्यालयातच राहा आणि आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही देण्यात आला आहे.मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सध्या पूर्वेकडून जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे येथील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ दोन दिवस कायम राहणार आहे. यामुळे मंगळवारी आणि बुधवारी मुंबई तसेच कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावेपुरेसे पाणी प्यावे.हलक्या रंगाचे , सूती, सैल कपडे परिधान करावेत.भर दुपारी बाहेर फिरताना छत्रीचा वापर करावा, टोपी घालावी.चक्कर येणे , डोकेदुखी, मळमळणे, अतिघाम ही लक्षणे उष्माघाताची असू शकतात. त्यानुसार वैद्यकीय मदत घ्यावी.पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.

उन्हात अती कष्टाची कामे करू नये.दुपारी १२ ते ३ दरम्यान आवश्यकता नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे.बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

सामान्यत: सलग दोन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने अधिक राहिले, तर त्या दिवशी उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. मार्च ते मे महिन्यात देशाच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता असते. सध्या पूर्वेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या भागात हवा अधिक तप्त होत आहे. मागील काही दिवसांत कोकणातील अनेक जिल्ह्यांत तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढले आहे.

मुंबईतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक तप्त दिवस

(कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये)*

१९ फेब्रुवारी २०१७ – ३८.९

२३ फेब्रुवारी २०१५ – ३८.८

२८ फेब्रुवारी २०२० – ३८.४

*मुंबईतील फेब्रुवारीमधील विक्रमी तापमानाची नोंद*

२५ फेब्रुवारी १९६६- ३९.६ अंश सेल्सिअस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button