
म्हाप्रळ – आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी मंडणगडमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा
मंडणगड : मागील चार वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूर्णपणे बंद असलेल्या म्हाप्रळ – आंबेत पुलामुळे तालुक्यात गैरसोय होत आहे. याची गंभीर दखल घेत मंडणगड शहर व्यापारी संघटनेने दि. 14 नोहेंबर रोजी शहर व परिसरातील शेकडो व्यापार्यांनी मोर्चा काढला. यावेळी आंबेत पूल चालू करा, आंबेत पुलाचे काम पूर्ण करा, अशा घोषणांनी प्रशासनासह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
सकाळी 11 वा. शहरातील काटकर फर्निचर येथे शेकडो व्यापार्यांनी एकत्र येऊन मोर्चाची रूपरेषा तयार करत मोर्चास सुरवात केली. काटकर फर्निचर ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढला.
यावेळी तहसीलदार दतात्रय बेर्डे यांच्याकडे मंडणगड शहर व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. बंद असलेल्या आंबेत पुलामुळे मंडणगड शहर व तालुक्याच्या व्यापारासह सर्वच बाबींवर कसा परिणाम होत आहे व त्याचा मोठा फटका तालुक्याच्या अर्थकारणावर बसला असल्याची कैफियत मांडली. आंबेत पूल बंद असल्यामुळे वेळ आणि आर्थिक फटका या कारणांमुळे चाकरमानी असलेला कोकणी माणूस सुट्टीतही आपल्या गावाकडे येण्याचे टाळतो. पर्यटकांनी मंडणगड तालुका वगळता पर्यायी पर्यटनस्थळे शोधली आहेत. अशी अनेक उदाहरणे देवून आंदोलनकर्त्यांनी आंबेत पूल बंद असल्यामुळे होत असलेले गंभीर परिणाम प्रशासनासमोर मांडले.
प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. आंबेत पुलाचे काम पूर्ण करून पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करावा. सरकारने यास प्राधान्य द्यावे अन्यथा येत्या काही दिवसात मंडणगड शहर व्यापारी संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा व्यापारी संघटनेने प्रशासनाला दिला आहे. यावेळी शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, उपाध्यक्ष नीलेश गोवळे, श्रीपाद कोकाटे, वैभव कोकाटे, सचिव कौस्तुभ जोशी, दिनेश साखरे, विनोद जाधव, प्रवीण जाधव, योगेश जाधव, अंकुश सावर्डेकर, बापू शेठ, बशीर मसुरकर, कपडेकर आदी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांसह शहरातील शेकडो व्यापारी उपस्थित होते.
या आंदोलनाला वाहतूक संघटना, रिक्षा संघटना याचबरोबर मात्र परिसरातील व्यापार्यांनी देखील पाठिंबा दिला. या आंदोलनात अनेकजण सहभागी झाली होते. यासंदर्भात तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना चर्चेकरिता दुपारी बोलावले. यावेळी व्यापारी संघटनेचे शिष्टमंडळ व संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये अधिकारी वर्गाने येत्या दहा ते पंधरा दिवसात काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र यावर व्यापार्यांनी अधिकार्यांकडे केवळ तोंडी आश्वासन न देता लेखी आश्वासित करावे, अशी मागणी केली . त्याचबरोबर जोपर्यंत आम्हाला ठोस असे कोणतेही लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत व्यापारी संघटनेच्या लढा अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे देखील सांगितले. त्याचबरोबर आठवड्यातील सात दिवस 24 तास फेरीबोट सुरू राहावी या मागणीकरिता दि. 18 नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकारी व्यवस्थापन व व्यापारी यांच्यात बैठक घेण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.
तहसीलदार बेर्डे यांच्या मध्यस्थीने आंबेत पुलासंदर्भातील अधिकारी व तालुक्यातील व्यापारी यांच्यात चर्चा झाली असली तरी या चर्चेअंती कोणताही ठोस निर्णय न झाल्याने व्यापार्यांची आंदोलनाची भूमिका मात्र ठाम राहिली आहे.