
मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई येथे 26 मार्चला डाक अदालत
रत्नागिरी, दि. 24 :- मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांच्यामार्फत 26 मार्च रोजी दुपारी 3 वाजता दुसरा मजला, जी.पी.ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे 130 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/मनीऑर्डर/बचत बँक खाते/प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी.
तरी संबंधितांनी आपली तक्रारी सहाय्यक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डींग, जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह 14 मार्च 2024 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी कळविले आहे.000