
गुहागर ते शासकीय विश्रामगृह खराब रस्त्याबाबत ११ मे रोजी आंदोलन नियोजन बैठकीचे आयोजन
आबलोली : गुहागर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह पर्यंतचा मुख्य रस्ता चांगले कार्पेट मारून मिळावे या गुहागरप्रेमी नागरिकांच्या वतीने केलेल्या मागणीला गुहागर तहसीलदार कार्यालयाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी गुहागर प्रेमी नागरिकांची विशेष बैठक मोडकाआगर येथील विशाल बोटिंग क्लब येथे ११ मे रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. गुहागर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह पर्यंतचा मुख्य रस्ता चांगले कार्पेट मारून मिळावे यासाठी गुहागरप्रेमी नागरिकांच्या वतीने लोकशाही दिनात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी आपण आंदोलन करू नका दोन दिवसात राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना जनते समोर बोलावतो असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात तसे न घडता गुहागर तहसीलदार कार्यालयातून नेहमीप्रमाणे पत्र व्यवहार करून जबाबदारी ढकलण्याचे काम करण्यात आले आहे. या बाबत आता पुढील आंदोलन दिशा ठरविण्यासाठी गुहागर प्रेमी नागरिकांची विशेष बैठक ११ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलन नेमके आंदोलन कसे करायचे, याचे धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती गुहागर प्रेमी नागरिक ग्रुपचे पदाधिकारी समाजसेवक विशवनाथ रहाटे, अनिल शिंदे विकास जाधव, सुमित आठवले पराग कांबळे आदींनी दिली. संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी खराब रस्त्यावर चांगले कार्पेट मारून दिले नाही, तर मात्र आंदोलन उग्र करावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.