
आता या कोचमधून प्रवास करताना ‘मिडल बर्थ’च्या प्रवाशांना सकाळी सहापूर्वी झोपेतून उठावे लागणार.
लांब पल्ल्याच्या मार्गावर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या ‘मिडल बर्थ’च्या प्रवाशांची झोपमोड होणार आहे. स्लीपर, थर्ड एसी आणि थर्ड एसी इकॉनोमी कोचमधून प्रवास करताना ‘मिडल बर्थ’च्या प्रवाशांना सकाळी सहापूर्वी झोपेतून उठावे लागणार आहे.झोपेची ही वेळ न पाळणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.रेल्वे प्रवासात अनेकदा ‘मिडल बर्थ’चे प्रवासी कोणत्याही वेळी झोपतात. ते रात्री 10 ते सकाळी 6 ही झोपेची वेळ पाळत नाहीत. ते ‘मिडल बर्थ’ झोपण्याच्या स्थितीत ठेवत असल्यामुळे ‘लोअर बर्थ’च्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ‘लोअर बर्थ’चे प्रवासी आपल्या जागेवर नीट बसू शकत नाहीत. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ‘मिडल बर्थ’च्या प्रवाशांना झोपेच्या वेळेचे काटेकोर पालन करण्याचे बंधन घातले आहे.
‘मिडल बर्थ’चे प्रवासी आपणही तिकिटाचे तितकेच पैसे दिल्याचा दावा करीत सहप्रवाशांशी हुज्जत घालतात. त्यातून वादावादीचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ‘मिडल बर्थ’च्या प्रवाशांना सकाळी 6 वाजण्यापूर्वी उठणे बंधनकारक केले आहे. त्यांनी वेळेची मर्यादा पाळली नाही, याबाबत सहप्रवाशांनी तक्रार केल्यास ‘मिडल बर्थ’च्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.