
रत्नागिरी जिल्ह्यात “गाव तिथे जेष्ठ नागरिक संघ” मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद
कुवारबावच्या स्नेह मेळाव्यात ज्येष्ठांना संघटित होण्याचे आवाहन
रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ ही संकल्पना रत्नागिरी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात राबविण्याचा निर्धार केला आहे. त्याला जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा समाजाला फायदा करून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या छत्राखाली संघटित व्हावे, असे आवाहन कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी संघाच्या मासिक मेळाव्यात बोलताना केले.
कुवारबाव येथे 22 फेब्रुवारी संपन्न झालेल्या स्नेह मेळाव्यात फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे शुभेच्छा पत्र आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. श्याम सुंदर सावंत देसाई यांनी फेस्कॉमच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी ज्येष्ठांचा हक्काचा मार्गदर्शक असलेल्या फेसकॉमच्या मनोहारी मनो युवा मासिकाचे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी वर्गणीदार होऊन फेसकॉमची चळवळ घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केले.यावेळी माजी प्राचार्य डॉक्टर दत्ता पवार यांनी अभिजात मराठी भाषेचा अभिमान नव्या पिढीत रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन स्पर्धेचा उपक्रम राबवून समाजात वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रश्न आणि संघाने पुढाकार घ्यावा, असे यावेळी सुचित केले.
डॉक्टर रमेश साळुंखे, श्री. नारायण नानिवडेकर, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम, सौ सुप्रिया मोहिते, श्री प्रकाश शिंदे तसेच राजापूर तालुक्यातील मीठ गव्हाणे संघाचे अध्यक्ष श्री. विलास चेऊलकर आणि सचिव श्री. रमेश राणे यांनी फेस्कॉमची चळवळ गतिमान करण्यासाठी विधायक सूचना मांडल्या.प्रारंभी दिवंगत सदस्य माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरू झालेल्या या स्नेह मेळाव्याची पसायदानाने सांगता करण्यात आली. मेळाव्याला जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते