
चिपळूण कळंबस्ते येथे रेल्वे फाटक उघडे राहिले, रेल्वे मात्र वेगाने निघून गेली, दुर्घटना टळली
काहीसा अंधार पडला होता, रेल्वे फाटकही उघडे होते, अशात अचानक रेल्वेचा आवाज आला आणि पापणी लवण्याआधीच समोरून रेल्वे निघून गेली. हा धक्कादायक प्रकार चिपळूण कळबंस्ते रेल्वे फाटकाजवळ शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता अनेकांनी अनुभवला.अनेक वर्षात पहिल्यांदाच हा प्रकार घडला. अनेकांनी प्रसंगावधान राखत फाटकापासून बाजूला पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती पुढे येत आहे.
शहरालगतच्या कळंबस्ते रेल्वे फाटक येथे शनिवारी २२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिपळूणवरुन रत्नागिरीकडे धावणारी प्रयागराज एक्सप्रेस फाटक न पडताच निघून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेली अनेक वर्षापासून कळंबस्ते रेल्वे फाटक येथे उड्डाण पुल करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम हे वर्षानुवर्षे याविषयाचा पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला यश आलेले नाही. कळबंस्ते येथून खेड हद्दीतील पंधरागाव विभागात जाण्याचा प्रमुख एकमेव मार्ग आहे.
चिपळूण व खेड तालुक्याच्या जोडणाऱ्या या महत्वपुर्ण मार्गावर रेल्वे फाटकाचा नियमीत अडथळा निर्माण होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर जलद व अन्य गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरात ६० हून अधिक फेऱ्या या मार्गावर होत असल्याने त्या कालावधीत कळंबस्ते येथील रेल्वे फाटक बंद ठेवावे लागते. परिणामी दोन्ही बाजूने वाहने अडकून पडलेली असतात. याशिवाय विद्यार्थी, कामगार वर्गाची देखील मोठी गैरसोय नियमीत होत असते.