
कर्नाटकच्या बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही: शिवसेना ठाकरे गटाचा इशारा; कर्नाटकच्या दोन बसवर लावले भगवे झेंडे
एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना मारहाण करणाऱ्या कन्नड वेदिका संघटनेवर बंदी घालावी, तसेच कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, तोपर्यंत कर्नाटकच्या बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही’, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी आज येथे दिला.कोल्हापुरातून बंगळूरला गेलेली एसटी बस परत येताना चित्रदुर्ग येथे कन्नड कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत थांबवली. चालक भास्कर जाधव व वाहक प्रशांत थोरात यांना कन्नड येते का? अशी विचारणा केली. यावर कन्नड येत नसल्याचे चालकाने सांगताच कार्यकर्त्यांनी चालकाला काळे फासून मारहाण केली. या सर्व प्रकारामुळे प्रवासी भयभीत झाले. त्यानंतर बस सुमारे सहा तास विलंबाने बंदोबस्तात महाराष्ट्राच्या दिशेने आली.
या घटनेचा निषेध म्हणून शिवसेना ठाकरे गटाने मध्यवर्ती बसस्थानकासमोर जोरदार निदर्शने केली. मराठी भाषिकांवर अन्याय कराल, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जिल्हाध्यक्ष देवणे यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहनच्या दोन बस अडवल्या. कर्नाटक सरकारचा धिक्कार करीत कार्यकर्त्यांनी बसवर भगवा झेंडा लावला. काही वेळात पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करीत पोलिस गाडीत बसविले. नंतर काही वेळाने सोडून दिले. यानंतर एसटी महामंडळाकडून कर्नाटकात जाणारी वाहतूक आज दिवसभर थांबवण्यात आली. दरम्यान, कर्नाटकात अडविलेल्या एसटी बसचे चालक भास्कर जाधव व वाहक प्रशांत थोरात यांचा शिवसेनेच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
या आंदोलनात राजू यादव, पोपट दांगट, चंद्रकांत भोसले, मंजित माने, राजू जाधव, विकी काटकर, गोविंद वाघमारे यांनी सहभाग घेतला.मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, आजरा, चंदगड, गडहिंग्लज येथून बेळगाव, चिक्कोडीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी बस दिवसभर बंद राहिल्या. एकूण ३६ फेऱ्या बंद राहिल्या.
एक हजार ३३९ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला. अंदाजे चार ते पाच लाखांचा महसूल बुडाला. चंदगड, आजरा, गडहिंग्लज आगारातील काही फेऱ्यांतून कर्नाटक सीमेपर्यंत प्रवासी वाहतूक करण्यात आली, अशी माहिती एसटीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, कोल्हापुरात कर्नाटकाच्या दोन बस अडविल्याची माहिती मिळाल्यानंतर बेळगाववरून कोल्हापूर, पुणेकडे जाणाऱ्या कर्नाटक परिवहनच्या बस फेऱ्याही बंद झाल्या. रात्री उशिरापर्यंत दोन्हीकडील सेवा बंद राहिल्या.