
सावंतवाडी आणि रत्नागिरी पॅसेंजर सुरू करा, नाहीतर 1 मार्चला दादर स्टेशनवर रेल रोको; शिवसेनेचा उग्र आंदोलनाचा इशारा.
दादरहून कोकणात जाणाऱया सावंतवाडी व रत्नागिरी पॅसेंजर अचानक बंद करून कोकणी जनतेची गैरसोय करणाऱया मध्य रेल्वेला गुरुवारी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला. सावंतवाडी आणि रत्नागिरी पॅसेंजर वेळीच सुरू करा, नाहीतर 1 मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱया ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना तसे स्मरणपत्र दिले.
कोकणच्या गाडय़ा उत्तर प्रदेशकडे वळवून कोकणी जनतेला दिलेली सापत्न वागणूक खपवून घेणार नसल्याचे शिवसेनेने मध्य रेल्वेला ठणकावले.दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यासाठी रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेला दोनदा पत्र दिले होते आणि कार्यवाहीला गती देण्याची मागणी केली होती. त्याकडे रेल्वे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन्ही पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन देऊन 40 दिवस उलटले तरी प्रशासन ढिम्म राहिले. कोकणी जनतेवर केल्या जाणाऱया या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. शिष्टमंडळात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे, रेल प्रवासी संघटनेच्या अॅड. योगिता सावंत, नरेश बुरघाटे, चंद्रकांत विनरकर आदी पदाधिकारी होते.
दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू कराव्यात, यासंदर्भात रेल्वेकडून वेळीच योग्य ती कार्यवाही न झाल्यास 1 मार्चला दादर स्थानकात ‘रेल रोको’ केला जाईल, दादर-गोरखपूर व दादर-बरेली या ट्रेन सोडू देणार नाही. यामुळे होणाऱया नुकसानीची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील, असे शिवसेना शिष्टमंडळाने मध्य रेल्वेला बजावले.