
वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनाला स्थानिक ग्रामस्थांचा कडाडून विरोध.
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. भूमी अभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उप विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही संयुक्त मोजणी करण्यात येत होती. टोकाच्या विरोधामुळे नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही. परंतू या परिसरातील एका खासगी कंपनीच्या पंधरा एकर जमिनीची मोजणी करून अधिकारी माघारी परतले.भूमी अभिलेख विभागाकडून 12 फेब्रुवारीला संयुक्त मोजणीसाठीची नोटीस काढली. ती नोटीस कळझोंडीतील जमिनमालक, शेतकरी, ग्रामस्थांकडे वेळेत सुपूर्द करणे आवश्यक होते.
मोजणीला आठ दिवस असताना नोटीस वितरण सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक ग्रामस्थ मोजणी प्रक्रियेपासून अनभिज्ञच राहिले. प्रशासनाकडून या मोजणीविषयी संबंधित ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता उपअधिक्षक भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आज सकाळी कळझोंडी येथे दाखल झाले. अधिकार मोजणीसाठी येणार असल्यामुळे ग्रामस्थही तिथे जमा झाले. ग्रामस्थांनी प्रांत विभागाकडून काढलेल्या नोटीसीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांतर्फे उमेश संभाजी रहाटे, दिपक लक्षमण चौगुले, सहदेव, महेश जोगळे, शांताराम किर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जमीन मोजणीला विरोध असल्याचे निवेदनही दिले.
ग्रामस्थ एकवटल्यामुळे पोलिसांना बोलविण्यात आले. ग्रामस्थांची भुमिका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी जे ग्रामस्थ मोजणीसाठी तयार असतील त्यांची जमीन मोजली जाईल असे सांगितले. मात्र ग्रामस्थ ठाम होते. त्यामुळे अखेर तिथे असलेल्या एका खासगी कंपनीच्या अखत्यारितीली १५ एकर जमीनीची मोजणी करण्यात आली.