
रत्नागिरी तालुक्यातील मौजेगावडे आंबेरे-पाटील वाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका.
रत्नागिरी तालुक्यातील मौजे गावडे आंबेरे पाटीलवाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना आज (२१ फेब्रुवारी) सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती पावस पोलीस ठाण्यातून मिळताच वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी पोहचत एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात यश मिळविले. हा बिबट्या नर जातीचा असून तो सुमारे ८ ते 9 वर्षे वयाचा आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे गावडे आंबेरे पाटीलवाडी येथे राहणारे नीलेश मधुकर पाटील यांच्या परसबागेतील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती पावस पोलीस ठाण्यात कळविण्यात आली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पावस पोलीस ठाण्यातून तातडीने या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आवश्यक साहित्यासह शासकीय वाहनांमध्ये पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर सुमारे , २० ते २५ फूट खोल असलेल्या या विहिरीतील पाण्यात बिबट्या पायरीवर सुरक्षित बसलेला दिसला. तर त्या बिबट्याची सुटका करण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. पिंजऱ्याला दोऱ्या बांधून तो पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने विहिरीवर जाळी टाकून एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात यश आले. हा पिंजरा विहिरीबाहेर काढून बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून बिबट्या सुस्थितीत असल्याचे सांगितले. ही रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, न्हानू गावडे (वनपाल पाली), श्री. प्रभू साबणे (वनरक्षक रत्नागिरी), श्रीमती शर्वरी कदम (वनरक्षक जाकादेवी), तसेच गावच्या पोलीस पाटील, शिवार आंबेरे गावच्या पोलीस पाटील, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, स्वस्तिक गावडे, शाहिद तांबोळी तसेच गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते. हा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.




