रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव शनिवारी

रत्नागिरी, दि. 20 :- जिल्हा ग्रंथोत्सव, 2024 चे आयोजन 22 व 23 फेब्रुवारी या कालावधीत शासकीय विभागीय ग्रंथालय येथे होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद व काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोल्हापूर शाखा आणि पुण्यातील प्रकाशक व विक्रेते यांची ग्रंथ दालने लावण्यात येणार आहेत. ग्रंथ प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी 22 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथोत्सवाचे सुरुवातीस उद्घाटनाच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर ग्रंथ दिंडी जी. जी. पी. एस. हायस्कूल येथून निघणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय, जयस्तंभ, येथे येईल. मान्यवर व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि ग्रंथ प्रेमी मोठ्या संख्येने ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता “गोडी वाचनाची नव्या पुस्तकांची” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून राजापूर तालुक्यातील जेष्ठ साहित्यिक मदन हजेरी व डी.जी.के. महाविद्यालयाच्या सह प्राध्यापक वसुंधरा जाधव हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी 3.00 वाजता “माझे संविधान माझा अभिमान” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, कायदा विषयावरील तज्ज्ञ जिल्हा कोषागार अधिकारी, प्रवींद बिरादार व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निलेश पाटील हे सहभागी होणार आहेत.23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता “मराठी राज्य भाषा चला ज्ञान भाषा करु” या विषयावर मराठी भाषा प्रेमी वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, कोळंबे डॉ. सदानंद आग्रे, आणि सह अध्यापिका, स्वामी स्वरुपानंद विद्यालय, पावस शीतल सामंत हे सहभागी होणार आहेत. दुपारी 2.30 वाजता निमंत्रित कवींचे काव्य संमेलन व त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जेष्ठ कवयित्री सुनेत्रा जोशी या काव्य संमेलन व समारोपाचे अध्यक्षस्थानी आहेत. रत्नागिरी ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमाला जिल्ह्यातील ग्रंथ प्रेमी, वाचक प्रेमी, अभ्यासक, संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री स्टॉल आणि विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button