
भजन ही भगवंताशी एकरूप होण्याची कला : बुवा विश्वनाथ भाटे यांचे प्रतिपादन
श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचा भजनी कला मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न*रत्नागिरी (प्रतिनिधी) : भजन ही भगवंताशी एकरूप होण्याची कला असून संत नामदेव महाराज भजनात दंग होऊन पांडुरंगाशी बोलत असत. भजनी कलावंताने अभंग गवळण, भारुड, गजर या भजनी कलेतून परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रसिद्ध भजनी बुवा श्री. विश्वनाथ भाटे यांनी केले. रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने दिनांक 15 जून रोजी मासिक भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा उत्साहाने संपन्न झाला. यावेळी बुवा भाटे यांनी विविध भजने सादर करून राम कृष्ण हरी या गजराने भजनाची सांगता करताना भजनी कलावंतांना आषाढी वारीला गेल्याचा आनंद मिळवून दिला. यावेळी भजनी कलावंत बाळाजी घोसाळकर, सौ शुभदा आगाशे, सुरेंद्र घुडे, सचिन टिळेकर, राजन भाटकर, शिवराम कदम, समीक्षा वालम, अर्चना विलनकर, सुधीर वायंगणकर, रमाकांत पांचाळ यांनी भजनी कला सादर केल्या. यांना मृदंग साथ राजन साळवी व दत्ताराम लिंगायत यांनी केली तर टाळ साथ राजन भाटकर आणि चकवा साथ रमाकांत पांचाळ यांनी केली. श्रीराम मंदिर कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या भजनी मेळाव्याला श्री. दत्तप्रसाद गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढील भजनी मेळावा शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.