
तयारीला लागा…सेट परीक्षा 15 जूनला!
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी सहायक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी सेट परीक्षा येत्या 15 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी येत्या 24 फेब्रुवारीपासून 13 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे 40 वी सेट परीक्षा येत्या 15 जून रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर ,सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी या केंद्रांवर घेण्यात येईल. परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून, विद्यापीठाच्या https:/// setexam. unipune. ac. in/ या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे.
परीक्षा अर्ज भरण्यासाठीचा नियमित शुल्काचा कालावधी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 या कालावधीत 500 रुपये विलंब शुल्कासहित अर्ज भरता येणार आहे. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया शुल्कासह 800 रुपये इतके परीक्षा शुल्क असून, इतर मागासवर्गीय भटक्या व विमुक्त जाती-जमाती या संवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया शुल्कासह एकूण 650 रुपये एवढे परीक्षा शुल्क आहे.सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे.
परीक्षा शुल्क भरूनसुद्धा ज्या विद्यार्थ्यांची नावे संबंधित यादीत समाविष्ट नसतील अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा विद्यापीठाच्या set- support@pun. unipune. ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या https:/// setexam. unipune. ac. in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याला परत त्याच विषयाची सेट परीक्षा देता येणार नाही, असेही विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.