
आजपासून दहावीची परीक्षा!
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा आजपासून (21 फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थीसंख्या दोन हजारांनी वाढली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून नोंदणी केलेल्या 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली आणि 19 तृतीयपंथी आहेत.
राज्यभरातील 5 हजार 130 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प परीक्षा देऊ न शकल्यास संबंधित विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर 18 ते 20 मार्च या कालावधीत परीक्षेची संधी दिली जाणार आहे.
गोसावी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात 10.30 वाजता, तर दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित असले पाहिजे. गेल्या वर्षाप्रमाणेच परीक्षेच्या वेळेनंतर वाढीव दहा मिनिटे दिली जाणार आहेत.