
कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणे योग्य नाही नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानावरून महायुतीतच मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. नितेश राणे यांनी केलेल्या विधानानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याचे समजते.
राज्यात भाजपाचे सरकार असून, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितले की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितले की, तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो, ते अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. ही बाबत त्यांनी मान्य केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.