
फणसवळे येथे दिवसा घरफोडी 15 तोळे सोने व रोख रक्कम लांबविलीे.
15 तोळे सोने आणि 29 हजार 500 रूपयांची रोख रक्कम भरदिवसा घरफोडी करून करून चोरट्याने लांबवले ही घटना फणसवळे कोंडवाडी येथे घडली आहे.रत्नगिरीत चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. आंब्याच्या बागेसह शेतात मजुरीसाठी गेलेल्या शेतकर्यांची घरे हेरून आता घरफोडीसारखे प्रकार सुरू झाले आहेत. असाच एक प्रकार फणसवळे कोंडवाडी येथे घडला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूप सोनू माने हे फणसवळे कोंडवाडी येथे राहतात. त्यांची पत्नी मनाली व मुलगा रोहन आणि त्यांची मुलगी असे एकत्र राहतात.
मंगळवारी सकाळी सर्वजण कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. मुलगा एमआयडीसीत तर स्वरूप माने हे मजुरीसाठी गेले होते. तर त्यांची पत्नी शेतात कामाला गेली होती. रस्त्यालगतच असलेले स्वरूप माने यांचे घर बंद होते. दुपारी 12.30 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला. एकाखोलीत कपाट उघडून हाती काही लागतंय का हे पाहण्यासाठी कपाट अस्तव्यस्त केले. मात्र त्या कपाटात त्याच्या हाती काहीच लागले नाही.स्वरूप यांच्या पत्नीने घरातील सर्व दागिने आणि मोलमजुरी करून कमावलेली पुंजी एका लोखंडी ट्रंकमध्ये दडवून ठेवली होती. या ट्रंकवर चोरट्याची नजर पडली. अज्ञात चोरट्याने घरातील कोयतीनेच ट्रंक फोडला. त्याचवेळी तेथे असलेली एक सुटकेसदेखील त्या चोरट्याने फोडली. त्या ट्रंकमध्ये असलेले 15 तोळे सोन्याचे दागिने आणि 29 हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरून नेली.