प्राथमिक शाळेतील गुणवंत मुलांसाठी राज्यांतर्गत अभ्यास सहल संपन्न, समग्र शिक्षा अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा उपक्रम.

राष्ट्रीय आविष्कार अंतर्गत समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ची राज्यांतर्गत अभ्यास सहल नुकतीच रत्नागिरी व रायगड येथे दिनांक 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2025 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मकरंद देशमुख भाप्रसे.जि.प.सिंधुदुर्ग यांची प्रेरणा व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा अभियानाच्या कार्यक्रम प्रमुख श्रीमती स्मिता नलावडे मॅडम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गुणवत्ता पूर्ण शाळांतील 45 मुलांना या अभ्यास सहलीचा लाभ घेता आला. 15 ते 17 फेब्रुवारी 2025 अशा तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण स्थळे निवडण्यात आली होती.

गुणवत्ताधारक मुलांसाठी रिवार्ड (बक्षिस) देण्याचा हेतू ठेवत सिंधुदुर्ग नगरी येथून या अभ्यास दौऱ्याला सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे येथील प्रसिद्ध महाकाली मंदिर, पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचे समाधी स्थळ, थिबा राजवाडा, बाळासाहेब ठाकरे प्लॅनेटोरियम अर्थात थ्रीडी चष्म्यातून अंतराळ दर्शन, मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय, त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध अशा गणपतीपुळे येथील गणेश दर्शन, कोकण भूषण आद्यकवी केशवसुत यांचे मालगुंड येथील जन्मस्थान,कोरीव मार्बल वरील कविता, ग्रंथालय, तर दापोली तालुक्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अशा अभ्यासपूर्ण स्थळांना भेटी दिल्या. तर 17 फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्फूर्ती चेतवणाऱ्या रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली. रायगड किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी रोपवे मार्गाचा अवलंब करून संस्मरणीय रोमांचक सुखद अनुभव मुलांना घेता आला.

येथे गाईड द्वारे राजांचा दरबार, राज्याभिषेक सोहळा, मुख्य प्रवेशद्वार, खलबतखाना, गंगासागर तलाव, टकमक टोक, अलिकडील राजांचे पुतळे, शिव कालीन बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ, येथून दिसणारे दूरवरचे किल्ले अशी माहिती घेऊन परतीच्या प्रवासात डेरवण येथील उभारण्यात आलेली शिवसृष्टी उठावदार प्रसंग चित्रातून पाहता आली. या अभ्यास सहलीतून तीनही दिवस मुलांचा उत्साह आणि कुतुहल द्विगुणित झाले होते.सहलीत पाहिलेल्या स्थळांच्या वैशिष्ट्य पुर्ण नोंदीसुद्धा मुलांनी डायरीत नोंद केल्या आहेत. हया अभ्यास सहलीसाठी निवड झालेल्या सर्व मुलांसाठी व सोबत असलेल्या शिक्षकांसाठी जेवण, नाश्ता व राहण्याची व्यवस्था समग्र शिक्षा अभियानातून करण्यात आली होती.

मुलांसमवेत वैभववाडी तालुक्यातून संदीप कोळेकर, देवगड तालुक्यातून सूर्यकांत साळुंके, वेंगुर्ले तालुक्यातून प्रज्ञा राऊळ व अर्चना बर्डे कोरगावकर तर समग्र अभियानाचे जिल्हा समन्वयक राजू पाटील या सर्वांनी मुलांसाठी तीनही दिवस अत्यंत प्रभावी निगराणी केली. दुरचा प्रवास असल्याने आरोग्याचीही काळजी घेण्यात यशस्वी झाले. समग्र शिक्षा अभियान व जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या या अभ्यास सहलीच्या यशस्वीतेमुळे निवड झालेल्या शाळांतील मुले, शिक्षक मुख्याध्यापक, पालक यांनी आनंद व्यक्त केला आहे.या उपक्रमाचे कौतुकही केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button