
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात येणारा पुतळा जगाला हेवा वाटेल असा भव्य दिव्य असणार-मंत्री नितेश राणे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत.महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात येणारा पुतळा जगाला हेवा वाटेल असा भव्य दिव्य असणार आणि जगभरातून लोक या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा ‘पायाभरणी समारंभ’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी आमदार दीपक केसरकर , आमदार निलेश राणे, आमदार कालीदासकोळंबकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आदी उपस्थित होते. यावेळी कोनशीलेचे अनावरण करण्यात आले.पालकमंत्री पुढे म्हणाले, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनविण्यात येणार आहे तो कसा बनतोय, कोण बनवतोय याची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेच्या समोर मांडावी असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. महाराष्ट्रातील जनतेचीच नाही तर संपुर्ण जगातील लोकांची नजर या कार्यक्रमाकडे आहे.
कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांची किर्ती संपुर्ण जगभर प्रसिध्द आहे. म्हणून आज जो कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, आमच्या माध्यमातून हा कार्यक्रमहोणं याबद्दल आम्ही सर्वजण स्वत:ला नशिबवान समजतो असेही ते म्हणाले. पुतळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रक्रीयेच्या पहिल्या दिवसापासून ते हा पुतळा कसा बनावा, त्याची डिझाईन कशी असावी, पुतळा कोणी बनवला पाहिजे, त्याची तांत्रिक बाबी काय असल्या पाहिजेत याबाबत अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत. यासाठी अनेक बैठका मंत्रालयस्तरावर घेण्यात आल्या आहेत.