
आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार
‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. भारतीय नौदलाची ‘आयएनएस गुलदार’ ही केवळ युद्धनौका नसून सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे.विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम व सदस्य यांनी बंदर विकासमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधले होते. त्यांनी या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पाठपुराव्यामुळे व बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रयत्नांनामुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत ई-निविदा सूचना प्रसिध्द केली आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त ‘आय.एन.एस.गुलद’ हे जहाज सध्या कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावर नांगरलेले आहे. ते जहाज विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात येणार असून यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे.हे जहाज 81 मीटर लांब आणि 1200 टन विस्थापन असलेली 30 मिमी. क्लोज रेंज गन आणि रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे. 30 डिसेंबर 1985 साली ही युध्दनौका नौदलात समावेश करण्यात आली. युध्द सज्जतेव्यतिरिक्त हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही वापरली जायची.विजयदुर्ग खाडी सुमारे 42 किलोमीटर लांबीची असून 40 ते 50 मीटर खोल आहे.
नागमोडी वळण,खाडीच्या दुतर्फा डोंगर असलेली ही सुरक्षित खाडी वादळी परिस्थितीतही नौकांना उपयुक्त आहे. विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परूळेकर यांच्या संकल्पनेतून विजयदुर्ग येथे 2005 मध्ये ‘अष्टशताब्दी महोत्सव’ साजरा करण्यात आला होता. त्यानंतर विजयदुर्ग येथे पर्यटनला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. विजयदुर्ग येथे किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी विजयदुर्ग येथे येतात. आता या पर्यटकांना किल्ल्याबरोबरच ही युद्ध नौका पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. यामुळे येथील पर्यटनात मोठी वाढ होणार असून सं पूर्ण जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ होणार आहे.