
बँक ऑफ महाराष्ट्र विश्वासार्हता असलेली बँक तरुण-तरुणींना कर्ज देऊन उद्योगधंदे ताकदीने वाढवा – उद्योग मंत्री उदय सामंत
रत्नागिरी, : बँक ऑफ महाराष्ट्र ही विश्वासार्हता असलेली बँक आहे. नव्या तरुण तरुणींना उद्योजक बनविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, कर्ज पुरवठा करावा. ताकदीने उद्योग धंदे वाढवा, असे मार्गदर्शन करुन रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आजारी ग्रंथालयांना सीएसआर फंडातून निधी देऊन वाचन संस्कृती वाढवावी, असे आवाहनही उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंचल कार्यालयाचे उद्घाटन उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी अंचल प्रबंधक सागर नाईक, उप अंचल प्रबंधक डी जे आर सुधाकर, मुख्य प्रबंधक दादासाहेब कुंभार, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, सर्वच शाखाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. बँकांनी जर सकारात्मक भूमिका घेतली आणि कमी वेळेत कर्ज दिले तर, मोठा व्यवसाय करु शकतात. उद्योग आणि व्यवसायाचा आर्थिक कणा म्हणजे बँक होय. येणाऱ्या ग्राहकांना सन्मानपूर्वक वागणूक द्या. निश्चितच तुमचादेखील सन्मान वाढेल. अधिकारी, शाखाधिकाऱ्यांनी नम्रतेची भूमिका घेतली पाहिजे. ग्राहकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. राज्यातील सावकारी मोडून काढण्यासाठी बँकांनी पुढे आले पाहिजे. बेरोजगार तरुण-तरुणींना उद्योग व्यवसायात उभे करुन पुण्याचे काम करा, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील आजारी पडलेल्या ग्रंथालयांना बँक ऑफ महाराष्ट्राने सीएसआरमधून मदत करुन सक्षम करावे. उद्योग व्यवसायाबरोबरच समाज प्रबोधन बँका करु शकतात, याचे उदाहरण दाखवून द्यावे. आंबा, काजू बागायतदार, मच्छीमार, भाजी विक्रेते यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन, सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, असे आवाहनही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी केले.*चौकट-**रत्नागिरीकर माझी खुर्ची कुणाला द्यायालाही देत नाहीत* उद्घाटनानंतर अंचल प्रबंधक श्री नाईक यांनी त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा उद्योगमंत्र्यांना आग्रह केला. परंतु, उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी त्यांच्या खुर्चीवर त्यांनाच बसवून शुभेच्छा दिल्या. हाच धागा पकडून भाषणात ते म्हणाले, मी दुसऱ्याची खुर्ची घेत नाही. माझी खुर्ची कुणाला देत नाही. रत्नागिरीकरही माझी खुर्ची कुणाला द्यायलाही देत नाहीत. या शाब्दिक कोटीवर उपस्थितांकडून भरभरुन दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. स्वागत प्रस्ताविक श्री. नाईक यांनी केले. अपूर्वा सरनाईक यांनी सूत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.000