
ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. ते राजीव कुमार यांची जागा घेतील. ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत असेल. राजीव कुमार १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत.ज्ञानेश कुमार १९ फेब्रुवारी रोजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा कार्यकाळ) कायदा-२०२३ च्या कलम ४ च्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच वेळी, ज्ञानेश कुमार यांच्या जागी आता डॉ. विवेक जोशी निवडणूक आयुक्त असतील.ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चपासून ते निवडणूक आयुक्तपदाची धुरा सांभाळत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेदरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती पत्र पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावर सुनावणी असल्याने त्यांनी यापूर्वी बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.अधिसूचना जारी करण्यापूर्वी, आज पंतप्रधान कार्यालयात निवड समितीची बैठक झाली. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात भाग घेतला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बैठक बोलावण्यात मोदी सरकारने दाखवलेल्या घाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात निवड समितीवरील सुनावणी लक्षात घेता पक्षाने बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली.