
कोल्हापूरच्या बुलेट रायडरचे शिरोडा येथे हृदयविकाराने निधन.
मित्रांसोबत बुलेट राईडसाठी गेलेले बुलेट रायडर अमोल रावसाहेब माळी (वय 47, रा. लिशा हॉटेल परिसर) यांचे शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) येथे हृदयविकाराने निधन झाले. सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बुलेट गाडीचे मेकॅनिक आणि बुलेटप्रेमींमध्ये डॉक्टर म्हणून ते परिचित होते.बागल चौक येथील अलंकार गॅरेजमध्ये बुलेटचे वस्ताद म्हणून प्रसिद्ध असलेले वडील रावसाहेब यांचा वारसा चालवताना अमोल यांनी बुलेट मेकॅनिक म्हणून स्वतःचे वलय निर्माण केले होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील बुलेटप्रेमींची दररोज गॅरेजमध्ये वर्दळ असे.
बुलेटप्रेमी ग्रुपमधून लेह-लडाखपासून अनेक ठिकाणी त्यांनी बुलेट रायडर म्हणून सहभाग घेतला होता. रविवारी पहाटे ते मित्रांसोबत बुलेट राईडसाठी शिरोडा येथे गेले होते. सायंकाळी बीचवर फिरत असता चक्कर येऊन अचानक कोसळले. सोबतच्या सहकार्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोणतेही व्यसन नसलेल्या माळी यांच्या अचानक निधनाने बुलेटप्रेमींना धक्काच बसला.