
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य यांचेच नाव?
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर हिवाळी अधिवेशनात दावा न करणार्या शिवसेना ठाकरे गटाने आता येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात या पदावर दावा करण्याचे ठरविले असून या पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.गेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळण्याबाबत चर्चा केली होती. मात्र प्रत्यक्ष शिवसेना ठाकरे गटातर्फे या पदावर दावा करण्यात आला नाही. शिवसेनेत विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्या नावांची विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा सुरू झाली. पण ती मध्येच थांबली.
भास्कर जाधवांसारख्या आक्रमक नेत्याऐवजी आदित्य ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव विरोधी पक्ष नेता पदासाठी प्राप्त झाल्यास त्याला सरकारतर्फे संमती दिली जाईल, असा संदेश भाजपतर्फे ठाकरे गटाला देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. भाजप आणि सरकारला नाव पसंत नसेल तर 10 टक्क्यांपेक्षा कमी आमदार असल्याचे कारण सांगून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला नाकारूही शकते, ही टांगती तलवार ठाकरे गटावर आहे.