
मालवण येथे छ. शिवरायांच्या पुतळ्याची पायाभरणी ‘शिवजयंती’ला होणार.
मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ब्राँझ धातूच्या उभारणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी रोजी स.11 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे होणार आहे.या कार्यक्रमासाठी खा. नारायण राणे, आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी सांगितले.पुतळा उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी अंतर्गत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर असून काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले आहे.