
नवी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के
राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.यामुळे दिल्लीतील जनता साखर झोपेत असताना अनेकजण खडबडून जागे झाले. यामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते.
हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला.दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे साखरझोपेत असताना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवण्यास सुरुवात झाली. यानंतर दिल्लीकरांनी खबरदारी म्हणून तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. दिल्ली-एनसीआरसह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.