
दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त २४ फेब्रुवारी रोजी सहभोजन आणि सहभजन
रत्नागिरी : भक्तीभूषण दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी रॅली, सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्री. कीर यांच्यासह माजी जिल्हा माहिती अधिकारी आणि समाज नेते प्रभाकर कासेकर, कार्यवाह चंद्रहास विलणकर, माजी कार्यवाह दिलीप भाटकर, सदस्य सुहास धामणसकर, आदेश भाटकर, कौस्तुभ नागवेकर उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देताना श्री. कीर म्हणाले, रॅलीची सुरुवात सकाळी ९ वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरापासून होईल. त्यानंतर ही रॅली प्रमोद महाजन क्रीडा संकुल जवळून आठवडा बाजार येथून एसटी बसस्थानक, जयस्तंभ ते मारुती मंदिर अशी मार्गक्रमणा करेल. त्यानंतर मारुती मंदिर येथून जयस्तंभ रामआळी मार्गे पतितपावन मंदिरापर्यंत येऊन समाप्त होईल. रॅली नंतर पतितपावन मंदिरात बांधकाम व्यवसायिक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट भजनी बुवा अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सत्कार केला जाणार आहे.संत गाडगेबाबा, श्रीमान भागोजीशेठ कीर आणि श्री. वि. दा. सावरकर यांच्या समवेत सकल हिंदू समाजातील विविध ज्ञातीच्या लोकांना एकत्रित करून सहभोजनाला सुरुवात केली होती. त्याचधर्तीवर गेली चार वर्षे हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
समाजातील सर्व ज्ञातीच्या लोकांचा एकत्रित सहभोजनाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्यानंतर विविध भजनी बुवांचा सहभाग असलेल्या भजनाच्या गजरातून भागोजी शेठ कीर यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. समस्त रत्नागिरीकरांनी या सहभोजनाचा आणि सहभजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष श्री. कीर यांनी केले आहे.