
श्री क्षेत्र परशुरामच्या प्रलंबित कामांसाठी अजित दादा पवार यांनी केला वाढीव निधी मंजूर.
श्री क्षेत्र परशुराम येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा नियोजनमधून सुरू असलेल्या प्रलंबित कामांबाबत विश्वस्तांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची भेट घेतलीप्रलंबित कामांसाठी जिल्हा नियोजनमधून अजित पवार यांनी 2 कोटी 43 लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला. अवघ्या काही तासातच 33 लाखांची प्रशासकीय मंजुरी दिली आणि विश्वस्तांच्या हातात तशी ऑर्डरही आली. उर्वरित निधी मार्चनंतर मिळेल, असेही ना. पवार म्हणाले.चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र परशुराम येथे सुरु असलेली जिल्हा नियोजनमधील काही कामे प्रलंबित आहेत. सांस्कृतिक भवन बांधून तयार आहे. मात्र अंतर्गत इतर कामे येत्या दोन-तीन वर्षांपासून रखडली आहेत.
या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर, विश्वस्त व उद्योजक राजू जोशी, विश्वस्त डॉ. प्रशांतपटवर्धन, व्यवस्थापक शंकर कानडे, तांत्रिक सल्लागार रामचंद्र वडके, अॅड. प्रथमेश रेळेकर यांनी मुंबई येथे मंत्रालयात ना. अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार शेखर निकम उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ हा विषय समजून घेतला व यापूर्वीच माझ्याकडे का आला नाहीत, असा आपुलकीने सवालही केला. तातडीने ना. पवार यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना फोन केला व वाढीव निधीला मंजुरी देत असल्याचे सांगितले. तसेच आपण पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. उदय सामंत यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 33 लाखांच्या निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि हा निधी मंजूर झाल्याची ऑर्डरही काही तासात मिळाली.