‘लव्ह जिहाद’ कायद्याला विरोध – रामदास आठवले!

राहाता : ‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्यास असे म्हणणे योग्य नाही. दलित-सवर्णसुद्धा एकत्र येतात. मुले-मुली एकत्र येतात, अशी लग्न होतात. हिंदू- मुस्लिम लग्न झाले, की त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज, शनिवारी शिर्डीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

जातीय सलोख्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘जातीय सलोखा न बिघडवता योग्य भूमिका असावी. मोदी सर्वांना समान मानतात. त्यांनी सर्वांसाठी योजना आणल्या. त्याचा मुस्लिम समाजालाही फायदा होतो. मोदी सरकार अतिरेकी मुस्लिमांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. मुलाने हिंदू धर्म स्वीकारावा अशीही तरतूद असावी. मी ह्या प्रॅक्टिकलमधून गेलोय. मुले, मुली एकत्र आले आणि सहमतीने लग्न झाले, तर त्यात वावगं काय, असेही त्यांनी स्पष्ट केले.आगामी पालिका निवडणुकीबाबत बोलताना आठवले यांनी सांगितले, की आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा मिळतील. जागा दिल्या नाही, तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे.

लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला जागा मिळाल्या नाहीत. पण महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला जागा मिळतील. महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही. मंत्रिपदाची अपेक्षा होती. किमान महामंडळे तरी मिळावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत आठवले म्हणाले, ‘आंधळे नावाचा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांनी एवढा वेळ लावता कामा नये. कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. परभणी घटनेतही पोलिसांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. तो हृदयविकाराने गेला अशा अफवा पसरविण्यात आली. यामध्ये जे पोलीस दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेण्याची आवश्यकता नव्हती.मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, या संदर्भात आठवले म्हणाले, ‘मुंडेंचे जरी कराडशी संबंध होते, मात्र प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध वाटत नाही.

राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणतात, ‘आरोप सिद्ध होऊ द्या.’शिर्डीतील गुन्हेगारीबाबत ते म्हणाले, की यापूर्वी शिर्डीत वादातून हत्या झालेल्या आहेत. मात्र, आता लुटीच्या उद्देशाने दोन निरापराध लोकांची हत्या झाली. पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. हत्येतील आरोपींना फाशी व्हावी अशी कुटुंबीयांची मागणी आहे. मयतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

मला शिर्डीतून एक फोन आला. शिर्डीतील शिक्षक बोलत असल्याचे सांगितले. शाळेची सहल गोंदियाला आली असून, बसचा अपघात झाल्याचे सांगितले. मी गोंदियाच्या कार्यकर्त्यांना फोन लावला. नंतर संबंधिताने गोंदियाला नाही, तर भंडाऱ्याला असल्याचे सांगितले. मुले जखमी असून त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात न्यायचे असल्याचे सांगितले. गाडी भाड्यासाठी ऑनलाईन पैसे मागण्यात आले. मला सातत्याने फोन येत होते. मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले. तो फोन बोगस असल्याचे लक्षात आले. असे फोन करून पैसे मागणाऱ्या टोळ्या आहेत, असा किस्सा मंत्री रामदास आठवले यांनी सांगितला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button