
राजन साळवींकडे गद्दारीची १३ सर्टिफिकेट असा आरोप करणाऱ्या विनायक राऊत यांच्यावर राजन साळवी यांचा पलटवार
पक्षात संधी असतांना देखील विनायक राऊतांमुळे मंत्री पदाची संधी हुकली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरोधात प्रचार करून मला निवडणुकीत पाडलं, असे म्हणत माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांनी थेट माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यात विनायक राऊतांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत १३ सर्टिफिकेट दाखल्यांची निर्वाळा दिला. त्यावर पुन्हा आता राजन साळवी यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
राजन साळवींकडे गद्दारीची १३ सर्टिफिकेट आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी उदय सामंत यांचा उदय करून घेतला हे जगजाहीर आहे. असे म्हणत विनायक राऊत यांनी साळवींचा सगळा इतिहास काढला होता. त्यावर जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना, मतदारांना मी कोण आहे, ते माहिती आहे. त्यामुळे माझ्या १३ सर्टिफिकेट बद्दल त्यांना सांगण्याची गरज नाही. असे साळवींनी म्हटलं.पुढे बोलतांना ते म्हणाले की, पक्षातच राहून पक्षातल्या लोकांना हाताशी घेऊन पक्षातले पदाधिकारी दुसऱ्या बाजूला पाठवायचे. मागच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते, त्यांच्याबरोबर सलगी करायची. त्याठिकाणी कसं काम केलं, हे लोकांसमोर आहे. विनायक राऊत असतील किंवा इतर कोणी ? या लोकांनी माझ्याविरोधात प्रचार करून मला निवडणुकीत पाडलं. त्यासाठी कुणाची मदत घेतली, हेही लोकांना माहिती आहे. परंतु मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिलो, हे कुणाला सांगण्याची गरज नाही.