
दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर!
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी काल रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी झाली होती. ही गर्दी अनियंत्रीत झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली असून, त्यामध्ये १८ जाणांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ महिला आहेत.*यानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गंभीररित्या जखमी झालेल्यांना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशानासनाने दिली आहे.
याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी रविवारी सांगितले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी आणि घटनेमागील कारणे शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच वेळी, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन घटनेतील पीडित आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, मध्य दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात १८ पैकी १५ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते आणि दोन वगळता सर्व मृतांची ओळख पटली आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये किमान तीन मुले असल्याचे त्यांनी सांगितले. आतिशी म्हणाल्या की, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर प्रयागराज जंक्शनवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरासह फूट ओव्हर ब्रिजवरील व्यवस्थेची जबाबदारीची सूत्रे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आपल्या हाती घेतली आहेत.