
नालासोपारा पावस एसटी बस सुरू करण्याची मागणी
रत्नागिरी : *जमीर खलफे* कोकणात चाकरमान्यांना येण्यासाठी एसटी महामंडळ नेहमीच सहकार्य करीत असते. तरीदेखील गावागावातून काही बसेस सुरू केल्याने चाकरमान्यांची चांगलीच चंगळ होत असते. दरम्यान, पावसवासीय मात्र या सुविधेपासून काहीसे वंचित झाले आहेत. अनेक वर्षे सुरू असलेली नालासोपारा-पावस एसटी बस सेवा महामंडळाने बंद केल्याने नालासोपारा, विरार परिसरात राहणाऱ्या पावसवासीयांची ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरच अडचण होणार आहे.सदरची एसटी बस अनेक वर्षांपासून नालासोपारा येथून संध्याकाळी 6:15 वा. सुटत होती. ती रत्नागिरीमार्गे पावसला सकाळी 5:00 वाजेपर्यंत पोहोचत होती. पुन्हा तीच गाडी पावसमधून संध्याकाळी 6:15 मिनिटाला सुटून नालासोपारा येथे सकाळी 5:00 वाजता पोहचत होती. त्यामुळे या भागातील लोकांची चांगल्याप्रकारे सोय होत होती. पण मागील एक महिन्यापासून सदरची एसटी बस बंद केल्यामुळे प्रवाशांचे फार मोठे हाल होत आहेत.एक महिन्यानंतर गणेश उत्सव सुरू होत आहे. नवनवीन गाड्यांची घोषणा होत आहे पण जी पूर्वीपासून एसटी बस सुरू होती ती बंद केल्यामुळे लोकांची नाराजी दिसून येत आहे. यामुळे एसटी बस गणेशोत्सवापूर्वी पुन्हा सुरू होईल का? अशी विचारणा परिसरातील प्रवाशांकडून केली जात आहे. यासंबंधी ग्रामस्थ अधिकाऱ्यांची भेट घेणार असून सदरची गाडी पुन्हा चालू करण्याची मागणी करणार आहेत. एसटी बस सुरू झाल्यास पावस परिसरातील अन्य गावातील प्रवाशांची देखील सोय होणार असल्याने एसटी बस तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.