
सावंतवाडी, येथील रेल्वे स्थानकावर पर्यटकांसाठी सुविधा रेल हॉटेल बांधण्याबाबत सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांनी पाहणी केली.
सावंतवाडी, येथील रेल्वे स्थानकावर पर्यटकांसाठी सुविधा म्हणून छोट्या कॉटेज न उभारता रेल हॉटेल बांधण्याबाबत सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांनी पाहणी केली. या रेल्वे स्थानकात अजून काही रेल्वेंना थांबा मिळावा आणि पाण्यासाठी योजना राबवावी, म्हणून आग्रही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सावंतवाडी रेल्वे स्थानकावर श्री. केसरकर यांनी बुधवारी (ता.१२) भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, सूरज परब, योगेश तेली, प्रसन्न शिरोडकर व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे स्थानकावर छोट्या कॉटेजीस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे विभागाने जागेची कमतरता भासत असल्यानेआता रस्ता बनविला आहे. त्या भागात आणखी एक प्लॅटफॉर्म बनविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे प्लॅटफॉर्मवर रेल हॉटेल बांधण्याबाबत चाचपणी मी केली आहे. तसेच पहिल्या आणि तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर ९ कोटी खर्चून निवारा शेड उभारता येईल का? ती पाहणी केली आहे. काही रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे गाड्यांत पाणी भरण्याची योजना मंजूर केली आहे. आता काहीअंशी प्रवासी निवारा शेड, रेल हॉटेल बांधण्याबाबत चाचपणी केली असून, रेल्वे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी चर्चा करणार आहे.’