
रेस मधली चार बडी नावे बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष!!
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी काँग्रेसमधलीच चार बडी नावे समोर आली होती. परंतु, या बड्या नावांना बाजूला सारून काँग्रेसने नवा प्रयोग करत हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स उंचावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटील यांची नावे चर्चेत होती.
हे सगळे काँग्रेसच्या घराणेशाहीचे प्रतिनिधी आहेत. अमित देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. विश्वजीत कदम पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत, तर विशाल पाटील यांचे चिरंजीव आणि वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. परंतु, या सगळ्यांना बाजूला सारून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.
हर्षवर्धन सपकाळ हे सध्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते राहुल गांधींचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्याबरोबरच काँग्रेस अध्यक्षांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेसच्या नेतेपदी निवड केली.