
संगमेश्वर थांब्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलकाची चर्चेसाठी बोलावली बैठक!
प्रजासत्ताकदिनी संगमेश्वर स्थानकात निसर्गरम्य संगमेश्वर व चिपळूण फेसबुक ग्रुप , स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तमाम जनसामान्यांचे उपोषण आणि जन आंदोलनाचे पडसाद आता चांगलेच उमटत आहेत.उपोषणाच्या दिवशी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी बेलापूर येथील मुख्य कार्यालयात आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व घटकांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आता मुंबईकडे प्रयाण करतील असा आशावाद प्रत्येक संगमेश्वर वासीयांनी व्यक्त केला.दिलेल्या सकारात्मक प्रस्तावाला, जर सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाला तर रेल रोको अटळ अशी माहिती आंदोलन कर्त्यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याआधी पत्राने कळविली आहे.
या पार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारीची बैठक निर्णायक ठरणार हे मात्र नक्की! निसर्गरम्य संगमेश्वर व चिपळूण फेसबुक ग्रुपने आजवररेल्वेच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवत सामंजस्याची भुमिका घेतली आहे परंतु यावेळी समाधानकारक तोडगा न काढल्यास यापुढे कोणत्याही बैठकीला आपण सहभागी होणार नाही असा निश्चय या ग्रुपचे प्रमुख आणि सदस्य यांनी बाळगला आहे.आता कोकण रेल्वेचे अधिकारी काय निर्णय घेतात? याकडे संगमेश्वर वासीयांचे लक्ष लागले आहे.
आता शिमगोत्सवाची धामधूम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या बैठकीमध्ये जर योग्य निर्णय झाला तर त्याचे परिणाम वेगळे असतील. संगमेश्वरवासी आनंदी दिसतील! पण विपरीत काही घडल्यास रेल रोको होणारच!हा गर्भीत इशारा स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे.