
महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी भक्तांसाठी किमान 100 एसटी बसेसची व्यवस्था करा-सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव नियोजनाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी भक्तांसाठी किमान 100 एसटी बसेसची व्यवस्था करा.भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. वीज व्यवस्था, मोबाईल नेटवर्क सक्षम करा. शौचालय व्यवस्था उपलब्ध करून द्या, आवश्यक त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारा, अशा सूचना मंत्री राणे यांनी अधिकार्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख अधिकारी त्याचप्रमाणे कुणकेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष, संचालक, सरपंच आदी उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, यात्रा काळात कुणकेश्वर मंदिर परिसरात भक्तांची गैरसोय होता नये. मंदिराकडे येणार्या तिन्ही बाजूचे रस्ते सुस्थितीत ठेवा. तुमचाच आमदार पालकमंत्री आहे, त्यामुळे आपण कुठेही कमी पडणार नाही. मंदिर प्रशासन आणिजिल्हा प्रशासन म्हणून जनतेला सर्व सुखसोयी देऊया. प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे भक्तांना कोणतीच अडचण भासणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मंदिर प्रशासन आणि ग्रामपंचायत यांनी सूचित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करताना मंत्री राणे यांनी संबंधित विभागाला सूचना देत कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करा. दरवर्षी या जत्रा असतात. आंगणेवाडी, कुणकेश्वर अशा मोठ्या जत्रांसाठी वीज व्यवस्था, टेलिफोन नेटवर्कची व्यवस्था ही कायमस्वरूपी सुसज्ज असली पाहिजे. याबाबत ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करा. पुन्हा पुढील वर्षी याच समस्या, प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या.