
धगधगत्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू
गृहमंत्रालयाने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रणाणात जातीय हिंसाचार झाला आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या काही दिवसातच राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंग यांनी मणिपूरमध्ये तब्बल २१ महिने जातीय हिंसाचार सुरू राहिल्यानंतर राजीनामा दिली होता. मणिपूरमधील हिंसाचारात जवळपास २०० हून अधिक जणांचा मृ्त्यू झाला आहे तर हजारो लोक विस्थापित देखील झाले आहेत. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून मेतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये जातीय संघर्ष सुरू आहे.
मणिपूरमध्ये यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेतृत्वाखालील सरकार होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये, कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने एन. बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ९ फेब्रुवारी रोजी सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
भाजपाने बिरेन सिंग यांच्यानंतर मुख्यमंत्री पदा्च्या दावेदारासाठी मतैक्य तयार करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र भाजपा नेतृत्वाला यामध्ये यश आले नाही. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेस आणि इतर राजकीय विरोधकांकडून सातत्याने केली जात होती.