
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी यांनी आपले आंदोलन मागे घेतले
ई पीकपाहणी, ई फेरफार, ई चावडी, ई हक्क, ई कृषी, ई-प्रणालीमधील अडीअडचणी सोडविण्याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयातून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने अखेर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आता गावागावामधील शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांसह सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच ई प्रणालीमध्ये होणारे सकारात्मक बदलांमुळे आता तलाठ्यांचे काम, अधिक सुकर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ई पीकपाहणी, ई फेरफार, ई चावडी, ई प्रणालीमध्ये काम करताना येणार्या समस्या सोडविल्या जात नसल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आंदोलनाच्या भूमिकेबाबत वेळोवेळी जिल्हा संघाने सविस्तर निवेदने सर्व वरिष्ठ अधिकारी स्तरावर सादर केली होती. तसेच विभागीय आयुक्त कोकण विभाग यांना निवेदन देवून सदरच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जमाबंदी आयुक्त कार्यालयातील राज्य संचालक, जिल्हा संघाचे पदाधिकारी व तज्ञ तलाठी मंडळ अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करणेबाबत आग्रह धरलेला होता. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसलेने व्यथित होवून जिल्हा संघाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून १६ पासून दोन्ही जिल्ह्यातील सर्व तलाठी यांनी अतिरिक्त कार्यभार असलेल्या तलाठी सजाच्या चाव्या त्या त्या तहसिल कार्यालयात जमा करून आंदोलन सुरू केले होते. याला प्रतिसाद देत जमाबंदी आयुक्त कार्यालयात ई प्राणाली बाबतच्या स्थायी समितीची बैठक झाली. या चर्चेदरम्यान त्यांनी शेतकरी व तलाठी यांना ई पिकपाणीमध्ये काम करताना अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेतला.