
मुंबई-गोवा महामार्गावर शहराजवळच्या वालोपे परिसरातील डोंगरावर सोमवारी वणवा लागल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमींमध्ये संतप्त भावना.
मुंबई-गोवा महामार्गावर शहराजवळच्या वालोपे परिसरातील डोंगरावर सोमवारी (दि. 10) सायंकाळच्या सुमारास अचानक वणवा लागल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमींमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.अनेक पर्यावरणप्रेमींनी वणव्याची माहिती तातडीने वन विभागाला दिल्यावर चिपळूण वन विभागाच्या तसेच निसर्गप्रेमींच्या माध्यमातून हा वणवा रात्री उशिरापर्यंत विझविण्याचे काम करण्यात आले. मात्र, गेली अनेक वर्षे याच परिसरात सातत्याने वणवे लागत असल्याने समाजमाध्यमांवर याबद्दल तीव्र पडसाद उमटून वणव्यामुळे संतापाचा वणवा पेटल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.
सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील वालोपे डोंगराळ परिसरात वणवा लागल्याची घटना घडली. वणवा लागल्याचे काही निसर्ग व पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास येताच त्याचे पडसाद उमटू लागले तर काहींनी तातडीने चिपळूण वन विभागाशी संपर्क केला. चिपळूण वन विभागाच्या वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी या माहितीची दखल घेत तातडीने वन विभागाच्या वणवा विझविण्यासाठी असलेल्या यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेतली.मोठ्या प्रमाणात वणवा व वार्याचा वेग यामुळे वणवा आटोक्यात येण्यास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
त्यातच अपुरे मनुष्यबळ असल्याचे लक्षात आल्यानंतर वनाधिकारी देसाई यांनी समाज माध्यमातून वणवा विझविण्यासाठी मनुष्यबळअपुरे पडत असल्याचे निदर्शनास आणताच तातडीने चिपळुणातील निहार कोवळे, अनिकेत शिंदे, आदित्य शिंदे, अमेय चितळे, ओंकार नलावडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन वणवा विझविण्याकरिता रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू केले. अखेर वणवा काही तासांनी आटोक्यात आला. मात्र, वणवा लागलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे, गवत जळून खाक झाले.




