
पारंपरिक मच्छीमारांच्या नोटिसा मागे घेणार.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दालदा (गीलनेट) पद्धतीने मासेमारी करण्याऱ्या पारंपरिक मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत नोटिसांसदर्भात मच्छीमारांनी राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील एकाही मासेमारी नौकेचे नूतनीकरण थांबणार नाही अथवा डिझेल परतावा रोखणार नाही, असे आश्वासनही राणे यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले.समुद्रात चालणाऱ्या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे, परंतु त्याचा फटका पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या अधिकृत मच्छीमारांनाही बसू लागला आहे.
कोमासेमारी नौकेला कलर कोड नसणे, नौकेवर क्रमांक नसणे, तसेच जाळी ओढण्यासाठी बूम (विंच)चा वापर करणे आदी मुद्द्यांवर मच्छीमारांना नोटिसा बजावण्यात येऊ लागल्याने तीव्र नाराजी होती.यासंदर्भात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नर्ड डिमेलो, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, महिला अध्यक्षा नयना पाटील, युवा अध्यक्ष मिल्टन सोदिया, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष माल्कम कासुघर, ठाणे जिल्हा सचिव माल्कम भंडारी, उत्तन वाहतूक सहकारी संस्थेचे बोना मालू आणि विल्सन बांड्या आदींच्या शिष्टमंडळाने नुकतीच नितेश राणे यांची भेट घेतली.
पर्ससीन मासेमारी नौका एकाच फेरीत प्रचंड प्रमाणात मासे पकडत असल्याने त्यांना जाळी ओढण्यासाठी हायड्रॉलिक बूम बसविणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र पारंपरिक मच्छीमारांना बूम वापरण्याची बंदी असल्याचे कायद्यात कुठेही उल्लेख नसल्याचे शिष्टमंडळाने राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मच्छीमारांना बजावण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याचे निर्देश राणे यांनी दिल्याची माहिती बर्नड डिमेलो यांनीदिली