
ठेकेदारांची बिले थकीत राहिल्याने जि.प. पाणीपुरवठ्याची शेवटच्या टप्प्यातील कामे थांबली.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली होती, मात्र कामे पूर्ण होवूनही शासनाकडून ७० कोटी रुपयांची ठेकेदारांची बिले थकित राहिल्याने शेवटच्या टप्प्यात असलेली अनेक कामे ठेकेदारांनी बंद केली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यातही महिलांच्या डोक्यावर हंडा कायम राहणार आहे.
जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणी पुरवठा योजनांपैकी ४३९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३१९ योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या कालावधीत कामे पूर्ण न झाल्याने या कामांना मुदत वाढवून देण्यात आली. जलजीवन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची सुमारे ७० कोटी रुपयांची बिले मिळावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून निधी रखडल्याने कामे दिलेल्या मुदतीत कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जिल्हा परिषदेला सतावत आहे.www.konkantoday.com