
8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून…. तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी
राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या खोट्या बातमीने सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले नव्हते तर तो मित्रांसोबत बँकॉकला गेल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर या ‘अपहरण’ नाट्यावर पडदा पडला असला तरी याप्रकरणातील तपशीलाची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये बसून पुण्याच्या लोहगाव विमानतळावर गेले. तिकडून ऋषिराज सावंत (Rishiraj sawant) हे मित्रांसोबत चार्टर्ड विमानाने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले होते.
ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऋषिराज सावंत यांचे विमान अंदमान निकोबारपर्यंत पोहोचले होते. मात्र, पुण्यात गोंधळ उडाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधून हे चार्टर्ड प्लेन चेन्नईला उतरवण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर या विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले आणि हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर दाखल झाले.
या सगळ्याबाबत तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, ऋषिराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही. आम्ही रात्री गप्पा मारल्या. प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषिराजने रुद्राभिषेक केला. त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो. ऋषिराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता. मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा केला, हा प्रश्न मला पडला होता. दिवसातून आमचे अनेकदा फोनवर बोलणे होते. मग हा एअरपोर्टला अचानक का गेला, हे मला समजत नव्हते. त्यामुळे आम्ही ‘वरी’ होतो. त्याच्यासोबत त्याचे मित्र होते. पण पप्पा रागवतील का, या भीतीने त्याने मला काही सांगितले नाही का, हे आता त्याच्या बोलल्यानंतर कळेल, असे तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.