
3 हजार खासगी रुग्णालयांना आरोग्य विभागाची नोटीस!
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरात खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 19 हजार 388 रुग्णालयांची पाहणी करण्यात आली. निकषांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या 3 हजार खासगी रुग्णालयांना आरोग्य विभागाने दणका दिला आहे. पुढील महिन्याच्या आत निकषांची पूर्तता करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी खासगी रुग्णालयांच्या तपासणीची विशेष मोहीम आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याबाबत पत्र देण्यात आले. राज्यातील खासगी रुग्णालयांकडून नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर तपासणी पथके तयार करून तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्रुटी आढळून आलेल्या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेची जबाबदारी प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदांमधील जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.तपासणी करून आरोग्यसेवा आयुक्तांकडे दैनंदिन अहवाल सादर करण्यात येत आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळलेल्या रुग्णालयांना केवळ नोटीस पाठवण्याचा फार्स न करता कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आरोग्य हक्क संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्रीखासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. निकषांची पूर्तता न करणार्या रुग्णालयांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. तसेच, मोहिमेमध्ये लहान स्वरूपाच्या रुग्णालयांना तसेच डे केअर सेंटर यांना नाहक त्रास देण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
तपासणी करून आरोग्यसेवा आयुक्तांकडे दैनंदिन अहवाल सादर करण्यात येत आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळलेल्या रुग्णालयांना केवळ नोटीस पाठवण्याचा फार्स न करता कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आरोग्य हक्क संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.