
कोकणातील मच्छीमारांसाठी फायद्याचा निर्णय; 120 अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या नौकांना डिझेल कोटा मंजूर
रत्नागिरी : कोकणातील 120 अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या सागरी मच्छीमार नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्याचा निर्णय मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी घेतला. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक घेतली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांतील मच्छिमारांना याचा फायदा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 36 सहकारी संस्थांचे बंद पडलेले डिझेल पंप आता पुन्हा गजबजणार आहेत.
या बैठकीला मत्स्य व्यवसायचे प्रधान सचिव, आयुक्त, प्रादेशिक आयुक्त, रत्नागिरी-सिंधुदुर्ग , ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि मच्छीमार नेते यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रत्नागिरीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी आमदार हुस्नबानू खलिफे आदी उपस्थित होते.
या बैठकीत 120 अश्वशक्तीवरील मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात पुढच्या आठवड्यात शासनाचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डिझेल कोट्यावरच्या 36 सहकारी संस्था असून त्यांचे डिझेल पंप बंदरांवर कार्यरत होते. परंतु डिझेल कोटा बंद झाल्याने या संस्थांच्या डिझेल पंपांवर मिळणारे बाजारभावापेक्षा अधिक दराचे डिझेल कोणी घेत नव्हते. त्यामुळे हे पंप बंद करावे लागले. गेल्या दीड महिन्यांपासून हे पंप बंदच आहेत. ते आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.