
पत्तन विभागाला डावलून बंदर विभागाला कामे देण्याच्या पद्धतीला समविचारीचा विरोध
रत्नागिरीः
सागरी बांधकामे करणाऱ्या पत्तन विभागाला डावलून बंदर विभागाला कामे दिल्याने प्रशिक्षित अनूभवी तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अभावी कोट्यवधी निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र समविचारी मंचने केला असून यातून लाखो रुपयांचा चुराडा होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सागरी अभियंता मुंबई यांच्या अधिपत्याखालील पत्तन अभियंता रत्नागिरी कार्यालय मागील अनेक वर्षे कार्यरत आहे.सागर किनारी जेट्टी,पाखाड्या,सागरी धक्के, याशिवाय नागरी सुविधांसाठी हे कार्यालय काम करीत होते.रत्नागिरी .दापोली,दाभोळ येथे याविभागाच्या शाखा कार्यरत होत्या.अत्यंत उत्तमरित्या सुरु असलेली ही कामे शासनाने पत्तन विभागाकडून काढून ती कामे बंदर विभागाला दिली.त्यातून पत्तन विभाग असून नसल्यासारखा झाला आहे.
वास्तविक पत्तन विभागाकडून होणारी सर्व कामे बंदर विभागाशी समन्वय साधून केली जायची.निव्वळ पत्तन अभियंता कार्यालय सागरी बांधकामे करण्यासाठीच असताना शिवाय बंदर विभागाशी समन्वय असताना अनुभव नसलेल्या बंदर विभागाला ही कामे करण्यास देण्याची गरज काय ? असा सवाल समविचारीचे अध्यक्ष बाबा ढोल्ये,राज्य सचिव संजय पुनसकर, महासचिव श्रीनिवास दळवी,राज्य सहसचिव मनोहर गुरव जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, जिल्हा सरचिटणीस आनंद बा.विलणकर आदींनी केला आहे.
बाणकोट धरण,मिरकरवाडा,बंदर,धूप प्रतिबंधक बंधारे अशी वैशिष्ट्यपूर्ण कामे पत्तन विभागाने पूर्वापार केलेली आहेत.पण बंदर विभागाला मध्येच घुसडल्याने आता या कामाचा दर्जा, गुणवत्ता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकीकडे पत्तन विभागाच्या आस्थापनेवर लक्षावधी रुपयांची उधळण होत आहे.दुसरीकडे सुमार, दर्जाहिन, तकलादू कामांवर केलेला खर्च समुद्राच्या पाण्यात जात आहे.कामेच नाहीत तर पत्तन विभागावरील आस्थापनेवर होणारा खर्च कशासाठी ? असा सवाल या निमित्तानं समविचारीने केला आहे.
बंदर विभागाने आजवर केलेली कामे,अदा केलेली रक्कम आणि कामाची गुणवत्ता यासह सर्व कामांची निविदा प्रक्रिया यांची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र समविचारी मंचने मा.लोकपाल महाराष्ट्र यांच्याकडे एका निवेदनाआधारे केली आहे.
www.konkantoday.com