राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा!_महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. ११) सुरू होत आहे. यंदा या परीक्षेसाठी यंदा १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत विद्यार्थांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत असणार आहे.

राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण दहा हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून आठ लाख १० हजार ३४८ विद्यार्थी, सहा लाख ९४ हजार ६५२ विद्यार्थिनी, आणि ३७ तृतीयपंथी यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील तीन हजार ३७३ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य मंडळाने पत्रकार परिषदेत दिली.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा कक्षात उपस्थित असावे. गेल्यावर्षीप्रमाणेच परीक्षेच्या वेळेनंतर वाढीव दहा मिनिटे दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, यासाठी समुपदेशक नियुक्ती आणि हेल्पलाइनही सुरू केली आहे.’

राज्य मंडळाने दिलेल्या सूचना –

  • वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर १२,१५ आणि १७ मार्च दरम्यान ‘आऊट ऑफ टर्न’चे आयोजन केले आहे.
  • बारावीची पुरवणी परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेणार आणि निकालही जुलैमध्येच जाहीर करणार
  • राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
  • राज्य मंडळ स्तरावरील हेल्पलाइन : ०२०-२५७०५२७१ आणि ०२०-२५७०५२७२

शाखानिहाय विद्यार्थी संख्या –

शाखा : नोंदणी केलेले विद्यार्थी

विज्ञान : ७,६८,९६७

कला : ३,८०,४१०

वाणिज्य : ३,१९,४३९

व्यावसायिक अभ्यासक्रम : ३१,७३५

आयटीआय : ४,४८६

एकूण : १५,०५,०३७

विभागनिहाय नोंदणी केलेले विद्यार्थी –

विभाग : विद्यार्थी संख्या

पुणे : २,५८,०३४

नागपूर : १,५८,६३९

छत्रपती संभाजीनगर : १,८६,५५०

मुंबई : ३,४२,४६६

कोल्हापूर : १,१७,८२८

अमरावती : १,५२,८११

नाशिक : १,६८,६४४

लातूर : ९५,५२१

कोकण : २४,५४४

एकूण : १५,०५,०३७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button