
आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि.11 – कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
फुलकिड नियंत्रणाबाबत कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसाणीविषयी परिस्थिती कृषी मंत्री श्री कोकाटे यांच्या निदर्शनास आणून मंत्री श्री. राणे म्हणाले की, या किडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध किटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही किड नियंत्रणात आलेली नाही. ही किड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यावेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.
मंत्री श्री. राणे यांच्या या सूचनांना कृषी मंत्री श्री. कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजन करण्याचे आदेश डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास दिले आहेत. तसेच याविषयी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनही यावेळी देण्यात आल्या. 00000