
राहुल सोलापूरकर प्रामाणिक भारतीय आहे, कोणत्याही महामानवाला कलुषित करण्याचा प्रयत्न माझ्याकडून स्वप्नातही होऊ शकत नाही,पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतो- राहुल सोलापूरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत मी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते. वेदांमधल्या चातुवर्णाचे वितरण सांगितल्याप्रमाणे मी ते मत मांडले होते. मात्र त्यातलीच दोन वाक्ये काढून काही लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न आज पुन्हा केला जातोय, असे सांगत कुणाची मने दुखावली असतील तर माफी मागतो, असे वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर म्हणाला.त्याआधी राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले.
शिवाजी महाराज आग्र्याहून सुटताना बादशाहला लाच दिली, मिठाईचे पेटारे वगैरे असे काही अजिबात नव्हते. केवळ इतिहास रंगवून सांगायचा म्हणून तसे सांगितले गेले, असे वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केले होते. तसेच आंबेडकरांबद्दलही त्याने वादग्रस्त वक्तव्य केले. सर्वत्र झालेल्या टीकेनंतर त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा उल्लेख केला ते भट म्हणून जन्माला आले तर तलवार हातात घेतले तरी ते क्षत्रीय ठरतात. याच न्यायाने रामजी सपकाळ यांचे चिरंजीव बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासाने एवढे मोठे झाले की त्या अर्थी ब्राह्मण ठरतात. वेदांमधल्या चातुवर्णाचे वितरण सांगितल्याप्रमाणे मी ते बोललो. त्यातलीच दोन वाक्ये काढून काही लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न आज पुन्हा केला जातोय.
मला प्रामाणिकपणे एवढेच सांगायचे आहे की गेली ४० वर्षे सार्वजनिक जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अशा अनेक विषयांवर मीजगभर व्याख्याने देतो आणि महत्वाचे म्हणजे या सर्व महामानवांसमोर नतमस्तक होऊनच मी व्याख्यानाला सुरुवात करतो.या महामानवांना आदर्श मानूनच ४० वर्षे मी माझ्या जीवनाची वाटचाल केली आहे. माझी व्याख्याने ज्यांनी ऐकली आहेत किंवा ज्यांनी माझे वैयक्तिक आयुष्य पाहिले आहे त्यांना हे सर्व माहिती आहे. तरी हे का केलं जात आहे याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मी ज्या महामानवांना आदर्श मानून जीवन जगतो, त्यांच्याविषयी माझ्याकडून कधीही वाईट वक्तव्य होणार नाही. परंतु जर माझी चूक झालीये, असं कुणाला वाटत असेल तर मी सर्वांची माफी मागतो.राहुल सोलापूरकर हा एक प्रामाणिक भारतीय आहे. कोणत्याही महामानवाला कलुषित करण्याचा प्रयत्न माझ्याकडून स्वप्नातही होऊ शकत नाही. पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतो.