
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट अखेर चोवीस तास वाहतुकीसाठी खुला
चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट अखेर प्रशासनाने वाहतुकीसाठी चोवीस तास खुला केला आहे. दि. 24 रोजी रात्री 12 वाजल्यापासून परशुराम घाटातील वाहतूक दिवस-रात्र सुरू राहणार आहे, असा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जाहीर केला आहे. संबंधित यंत्रणेला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरडप्रवण क्षेत्र म्हणून परशुराम घाट सुमारे दीड महिने वाहतुकीसाठी बंद होता. रात्रीच्यावेळी आंबडस-चिरणी मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. रात्रीच्या वेळी परशुराम घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होता. दरडीचा धोका लक्षात घेऊन परशुराम घाट रात्रीच्यावेळी वाहतुकीस बंद करण्यात आला. मागील महिनाभरात परशुराम घाटात एकदाही दरड कोसळलेली नाही. दिवसभरात घाटातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परशुराम घाट आता 24 तास खुला होणार आहे.